महाराष्ट्र जनमत न्युज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आम आदमी पार्टी, अमळनेरच्या वतीने आज पहाटे तहसील व प्रांत कार्यालय परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पहाटे ४ वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी श्रमदान करत परिसर स्वच्छ करून शिवरायांना अनोखी मानवंदना अर्पण केली.

तहसील व प्रांत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांची विशेष स्वच्छता करण्यात आली. कार्यकर्त्यांनी प्रतिमा स्वच्छ पाण्याने धुऊन परिसरातील कचरा, गवत व अस्वच्छता दूर केली. त्यामुळे संपूर्ण परिसर चकाचक व स्वच्छ दिसून येत होता.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हिताचे, शिस्तबद्ध आणि स्वच्छतेला प्राधान्य देणारे स्वराज्य उभे केले. त्यांच्या विचारांचा सन्मान केवळ घोषणांमधून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून व्हायला हवा. स्वच्छता हीच शिवरायांना खरी आदरांजली आहे.”

या उपक्रमात आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिवराज्याभिषेक दिनी राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाचे नागरिक आणि शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे.

“स्वच्छ परिसर – सुंदर महाराष्ट्र” हा संदेश देत आम आदमी पार्टीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले असून, नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *