महाराष्ट्र जनमत न्यूज

“आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशीच स्थिती पाणीपुरवठा विभागाची?

अमळनेर, दि. 05 जून 2026 — दिनांक 04/06/2026 रोजी सायंकाळी माननीय माजी नगरसेवक यांनी पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ आणि निष्काळजी कारभाराविरोधात अमळनेरकर जनतेला जाहीर आवाहन केले होते की, “उद्या सकाळी 11 वाजता नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी.”

या आवाहनाची दखल घेत महाराष्ट्र जनमत न्यूजने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि आज सकाळपासून संबंधित ठिकाणी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

माहितीनुसार, झामी चौक परिसरातील पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना तेथील पाणीपुरवठ्याचे महत्त्वाचे वाल्व्ह चेंबर संबंधित ठेकेदाराकडून माती व मुरूम टाकून पूर्णपणे बुजविण्यात आले होते. परिणामी परिसरातील नागरिकांना तब्बल दहा दिवस पाणीपुरवठ्याचा फटका बसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

आज घटनास्थळी माननीय माजी नगरसेवक तसेच महाराष्ट्र जनमत न्यूजचे मुख्य संपादक परेश उदेवाल यांनी पाहणी केली असता पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बुजलेले वाल्व्ह चेंबर शोधून काढण्यासाठी आणि ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर माती काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले.

आता काही थेट प्रश्न…

👉 संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेचे नुकसान केले असल्यास त्याला नोटीस बजावली जाणार का?

👉 नागरिकांना दहा दिवस पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला, त्याची जबाबदारी निश्चित केली जाणार का?

👉 ठेकेदाराकडून नुकसानभरपाई किंवा वसुली करण्यात येणार का?

👉 प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार का?

👉 नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या पाणीपुरवठ्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा प्रकरण दाबले जाणार?

सध्या तरी एकच प्रश्न अमळनेरकर नागरिक विचारत आहेत — प्रशासनाला नागरिकांच्या अडचणी आधी दिसत नाहीत का? की लोकप्रतिनिधींचे आव्हान आणि माध्यमांचा आवाज उठल्यानंतरच यंत्रणा जागी होते?

महाराष्ट्र जनमत न्यूज या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असून नागरिकांच्या पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *