महाराष्ट्र जनमत न्यूज बेवारस असला म्हणून माणूस कचऱ्यासारखा झाला का? ठेकेदाराची मुजोरी की प्रशासनाचे मौन? सोमवारपर्यंत कारवाई नाही तर महाराष्ट्र जनमत न्यूजचे मुख्य संपादक परेश उदेवाल यांचे कायदेशीर आंदोलन अमळनेर शहरात घडलेल्या एका संतापजनक प्रकाराने संपूर्ण शहर हादरले आहे. शहरालगत ईदगाह परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या एका अज्ञात इसमाच्या पार्थिवाची अंत्यविधीसाठी कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या घटनेमुळे मानवतेलाच काळिमा फासल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मृत व्यक्ती बेवारस असली म्हणून तिच्या पार्थिवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला दिला? अमळनेर नगर परिषदेकडे मृतदेह वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध असतानाही कचऱ्याच्या गाडीचा वापर का करण्यात आला? हा निर्णय कोणी घेतला? संबंधित ठेकेदार इतका बेफिकीर कसा झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. या घटनेवर महाराष्ट्र जनमत न्यूजचे मुख्य संपादक परेश उदेवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “आज जर एका बेवारस मृतदेहाची अशी विटंबना होत असेल, तर उद्या सामान्य नागरिकांनाही अशीच वागणूक मिळणार का? मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या पार्थिवाचा सन्मान राखणे ही प्रशासनाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.” ते पुढे म्हणाले, “अमळनेर नगर परिषदेकडे मृतदेह वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध असतानाही कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह नेण्याचा प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे. संबंधित ठेकेदारासह या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. जर सोमवारपर्यंत ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र जनमत न्यूज संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून कायदेशीर आंदोलन छेडेल. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.” शहरातील नागरिकांनीही संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत मृतदेह वाहतुकीसाठी उपलब्ध वाहने असताना घंटागाडीच का वापरण्यात आली? या गंभीर प्रकाराला जबाबदार अधिकारी कोण? ठेकेदाराला अभय देणारे कोण आहेत? मानवतेचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का? आता संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार का, की हा प्रकारही दडपण्याचा प्रयत्न होणार? याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागणार आहे. सोमवारपर्यंत ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र जनमत न्यूज चे मुख्य संपादक परेश उदेवाल व अमळनेरकर नागरिक कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडणार असून दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहणार, असा इशारा देण्यात आला आहे. Post navigation पहिल्याच पावसात नालेसफाईचा फज्जा उडाला! 🟢 अंबा ऋषी टेकडी फिल्टर प्लांटवरील क्लोरीन गॅस गळती नियंत्रणात; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये!