महाराष्ट्र जनमत न्यूज

सुभाष चौक ते रेल्वे स्टेशन मुख्य नाल्यात पाणीच पाणी; आरोग्य विभागाच्या कामकाजाची पोलखोल

शहरात झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने अमळनेर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या नालेसफाई मोहिमेचा अक्षरशः भांडाफोड केला आहे. सुभाष चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या मुख्य नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने नालेसफाईची कामे नेमकी झाली तरी कुठे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे नगर परिषद कार्यालयासमोरील परिसरातही पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. नाल्यांमधील गाळ, कचरा व अडथळे पूर्णपणे काढण्यात आले नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर आणि नाल्यांमध्ये तुंबल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी लाखो रुपयांची नालेसफाई झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात पहिल्याच पावसात मुख्य नाल्यांची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

नागरिकांचे म्हणणे आहे की, जर नगर परिषद कार्यालयासमोरील नाल्यांची ही अवस्था असेल तर शहरातील इतर भागांची परिस्थिती काय असेल, याचा सहज अंदाज येतो. केवळ कागदोपत्री नालेसफाई न करता प्रत्यक्ष कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शहरात पावसाळा नुकताच सुरू झाला असून आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नगर प्रशासनाने तात्काळ मुख्य नाल्यांची पाहणी करून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी अमळनेरकरांकडून होत आहे.

“पहिल्याच पावसात नालेसफाईचा फोलपणा उघड; आता तरी प्रशासन जागे होणार का?” असा सवाल संपूर्ण शहरातून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *