मुख्य संपादक…परेश उदेवाल

अमळनेर : शहरातील गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील अवैध नळ कनेक्शन प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, संबंधित प्रकरणात वारंवार तक्रारी, निवेदने व अल्टिमेट देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते परेश रवींद्र उदेवाल यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी अमळनेर नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देत दिनांक 28 मे 2026 पासून अमळनेर नगर परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

सदर प्रकरणात मोठ्या प्रमाणावर अवैध नळ कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप असून, यामुळे नगरपालिकेला आर्थिक फटका बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात कोणतीही FIR, निलंबन अथवा कठोर चौकशी करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

परेश उदेवाल यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की,

“प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून दोषींना संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे आता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.”

निवेदनामध्ये अवैध नळ कनेक्शन तात्काळ बंद करणे, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करणे, दोषींना निलंबित करणे तसेच स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार अनिल भाईदास पाटील तसेच अमळनेर पोलीस स्टेशनलाही देण्यात आली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाला आणखी तीव्र वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🔥 “कारवाई करा अन्यथा उपोषणाला सामोरे जा” असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आल्याने अमळनेर नगर परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *