महाराष्ट्र जनमत न्यूज

मुख्य संपादक…परेश उदेवाल

Aam Aadmi Party तालुका अमळनेरच्या वतीने गांधलीपुरा येथील बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामातील कथित अनियमितता, निधीचा अपव्यय आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून या पुलाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने पुढील काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीने आरोप केला की, माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांच्या कार्यकाळात लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून पूल उभारण्यात आला, मात्र पुलाच्या पुढे जाण्यासाठी रस्त्याची कोणतीही सक्षम व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे हा पूल आज “न वापराचा स्मारक” ठरत असून जनतेच्या कररूपी पैशांचा उघड उघड अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, वापराअभावी पुलावरील लोखंडी बॅरिकेड्स, ग्रिल व इतर साहित्य चोरीला जात असून सरकारी मालमत्तेची अक्षरशः लूट सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक संपत्ती धोक्यात आली असून याला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच, या पुलाला तांत्रिक मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “पूल बांधण्यापूर्वी पुढील प्रवेशमार्ग, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयींचा विचार का करण्यात आला नाही?” असा थेट प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांमध्येही या प्रकरणामुळे तीव्र नाराजीचे वातावरण असून “पूल झाला पण उपयोग शून्य” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करावे, दोषींवर कारवाई करावी आणि जनतेच्या पैशांचा झालेला अपव्यय थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आम आदमी पार्टीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *