महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर नगरपरिषदेचे प्रभाग क्र. ९ चे नगरसेवक तथा गटनेते पंकज पंडित चौधरी यांनी सोशल मीडियावरील ” अमळनेर रोखठोक या फेसबुक पेजवर आपली बदनामी करणाऱ्या पोस्टप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित फेसबुक पेज तसेच व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर त्यांच्या परवानगीशिवाय फोटो वापरून बदनामीकारक पोस्टर तयार करून प्रसारित करण्यात आले. या पोस्टरमध्ये त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह, अपमानास्पद व दिशाभूल करणारे मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरसेवक पंकज चौधरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, या पोस्टमुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमेला धक्का बसला असून समाजात चुकीचा संदेश गेला आहे. तसेच या प्रकारामुळे त्यांना मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या सोशल मीडिया पेजवरून बदनामीकारक मजकूर प्रसारित झाल्याच्या घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, हा प्रकार नियोजित व संगनमताने सुरू असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक पंकज पंडित चौधरी यांनी अमळनेर पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, संबंधित सोशल मीडिया खात्यांची तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार का, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. Post navigation कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांची तात्काळ धाव; ड्रेनेजचे आउटलेट चे पाणी विहिरीत जाणे थांबवून स्वच्छतेच्या उपाययोजनांना सुरुवात