महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेरकर तहानलेले, सत्ताधारी रील्समध्ये व्यस्त!

अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

विशेषतः मुंदडा नगर-१ परिसरातील नागरिकांना तब्बल ११ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष, सत्ताधारी पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी मात्र सोशल मीडियावर रील्स आणि प्रसिद्धीमध्ये रमल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

काही भागात सहा ते आठ दिवसांनी पाणी येते, तर काही भागात अकरा-बारा दिवस उलटूनही नळ कोरडेच आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे.

व्हॉल्वमनचा मनमानी कारभार ?

अधिकाऱ्यांचे मौन का?

नागरिकांच्या आरोपानुसार, काही विशिष्ट भागांना प्राधान्य देत इतर भागांवर अन्याय केला जात आहे. पाणी वितरणाचे कोणतेही ठोस नियोजन नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांनाही अधिकारी आणि कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप होत आहे.

“उशाशी पाणी, पण घसा कोरडा!”

पालिकेच्या गलथान आणि निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांना दहा-बारा दिवस जुने साठवलेले पाणी वापरण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

यंत्रणा कुचकामी – सत्ताधारी मस्त, अधिकारी सुस्त!

शहरात पाणीटंचाईचे गंभीर संकट असताना जबाबदार यंत्रणा मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप होत आहे. जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रसिद्धीचा दिखावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

जनतेचा सवाल…

११ दिवस नागरिकांना पाण्यावाचून तडफडावे लागत असताना पालिका प्रशासन नेमके काय करत आहे? जबाबदारांवर कारवाई कधी होणार? आणि अमळनेरकरांच्या नळातून पाणी कधी वाहणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *