महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहराला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने महिला हौसिंग ट्रस्टच्या भगिनींनी हाती घेतलेल्या वृक्षारोपण मोहिमेला प्रभाग क्र. ९ चे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते पंकज चौधरी यांनी भक्कम पाठबळ देत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. वृक्षारोपणासाठी आवश्यक खड्डे खोदण्याच्या कामात आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याची माहिती मिळताच पंकज चौधरी यांनी तत्काळ पुढाकार घेत संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या निर्णयामुळे वृक्षारोपण मोहिमेला नवी ऊर्जा मिळाली असून शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. न्यू प्लॉट परिसरातील रस्त्यालगत तसेच नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या मागील ओसाड जागेत वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे नगरसेवक पंकज चौधरी यांनी आपल्या चिरंजीव जित पंकज चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला. यावेळी बोलताना पंकज चौधरी म्हणाले, “आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी जीवनदायी ठेवा आहे. वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज आहे. शहर हिरवेगार करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा आणि महिला हौसिंग ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे.” महिला हौसिंग ट्रस्ट आणि नगरसेवक पंकज चौधरी यांच्या संयुक्त पुढाकारातून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे शहरात पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जनजागृती होणार असून आगामी काळात हजारो वृक्ष लागवडीचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. 🌱 “एक झाड… हजारो श्वास!” महिला हौसिंग ट्रस्टच्या या उपक्रमाने अमळनेरच्या हरित भविष्यासाठी आशेचा नवा अंकुर रुजवला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. 🌳💚 Post navigation अमळनेर शहरात अनधिकृत बॅनर व डिजिटल होर्डिंग्जविरोधात नगर परिषदेची धडक कारवाई डीवायएसपी विनायक कोते साहेबांची धडक कारवाई; अमळनेर बसस्थानक परिसरात वाहतूक शिस्तीचा नवा अध्याय!