महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना नागरिकांच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात एकही प्रशिक्षित (शिक्षित) फायरमन कार्यरत नसल्याची बाब नगरपरिषदेने स्वतः लेखी खुलाशातून स्पष्ट केली आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या गंभीर प्रकरणाची सुरुवात दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी झाली. सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवाल यांनी पुराव्यांसह मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून अग्निशमन विभागातील गंभीर त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.

त्यानंतर अनेकदा पाठपुरावा, स्मरणपत्रे आणि पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर दिनांक 27 मार्च 2026 रोजी नगरपरिषदेने दिलेल्या लेखी खुलाशात स्पष्ट नमूद केले की अग्निशमन विभागात एकही फायरमन कार्यरत नसून केवळ वर्ग-4 मदतनीस कर्मचारी कार्यरत आहेत.

हा खुलासा म्हणजे शहराच्या आपत्कालीन यंत्रणेवरच मोठा प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. आगीसारख्या जीवघेण्या प्रसंगी प्रशिक्षित फायरमनच बचावकार्याचे नेतृत्व करतात. अशा परिस्थितीत प्रशिक्षित मनुष्यबळाशिवाय शहराची अग्निसुरक्षा कशी चालते, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, शहरात सातत्याने आगीच्या घटना घडत असून, प्रत्येक घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. भविष्यात एखादी मोठी आग लागून जीवितहानी झाली, तर त्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवाल यांनी दिनांक 08 जून 2026 रोजी अप्पर सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA) ऑफिस आणि विभागीय आयुक्त, कार्यालय नाशिक यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून तातडीने प्रशिक्षित फायरमनची पदे भरणे, तसेच संबंधित बाबींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आता सर्वांच्या नजरा मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांच्याकडे  लागल्या आहेत.

नगरपरिषदेने स्वतःच लेखी स्वरूपात प्रशिक्षित फायरमन नसल्याची कबुली दिल्यानंतर शासनाकडे तातडीने पदभरतीचा प्रस्ताव पाठवला जाणार का? की एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार?

अमळनेरकर नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे—आग लागल्यानंतर धावून येणारा प्रशिक्षित फायरमनच नसेल, तर अग्निशमन विभाग नेमका कोणाच्या भरवशावर चालतो?

आता हा प्रश्न केवळ एका विभागाचा राहिलेला नाही, तर तो अमळनेर शहरातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन प्रशिक्षित फायरमनची नियुक्ती करणे ही काळाची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा....!