महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलीच्या काळ्या धंद्यावर अखेर पोलिसांनी जबरदस्त घाव घातला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्तरित्या टाकलेल्या धडक छाप्यात शहरातील दोन बेकायदेशीर गोवंश कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईने अवैध कत्तल व्यवसाय करणाऱ्यांची अक्षरशः पळता भुई थोडी झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोमांस, जिवंत जनावरे आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी घातक शस्त्रे आढळून आली.

धक्कादायक जप्ती…

  • तब्बल १,५७५ किलो गोमांस
  • ३ जिवंत बैल
  • कत्तलीसाठी वापरल्या जाणाऱ्या कुऱ्हाडी, कोयते, सु-या व इतर धारदार शस्त्रे
  • एकूण ४.७३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

अखेर पोलिसांनी दाखवला धाक!

अमळनेर शहरात अवैध गोवंश कत्तलीबाबत नागरिकांमध्ये दीर्घकाळापासून नाराजी होती. अनेकदा तक्रारी होऊनही हा काळा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा होती. मात्र एलसीबीच्या या कारवाईने अशा अवैध धंदेवाल्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, कायद्याचा हात आता त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचला आहे.

आता मोठा प्रश्न…

या कारवाईत ११ आरोपी पकडले गेले, पण या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार कोण? या अवैध व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणारे नेमके कोण? यामागे आणखी मोठे जाळे आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणार आहेत.

अमळनेरमध्ये पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई केवळ छापेमारी नसून, अवैध गोवंश कत्तलीच्या काळ्या साम्राज्यावर घातलेला मोठा घाव मानला जात आहे. शहरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत दोषींवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा....!