महाराष्ट्र जनमत न्यूज

अमळनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आज (२ जुलै) पहाटे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर धडक कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब, डीवायएसपी विनायक कोते साहेब, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेब यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, अमळनेर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस पथक व चोपडा येथील पोलिसांच्या संयुक्त सहभागातून ही कारवाई करण्यात आली.

पहाटे साडेतीन ते सकाळी सात या कालावधीत शहरातील विविध भागात तब्बल १२० गुन्हेगारांची घरे तपासण्यात आली. यामध्ये ७० गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आढळले. ५२ जणांना तंबी देऊन सोडण्यात आले, तर कोर्टात हजर न राहिलेल्या ६ जणांना अटक वॉरंट बजावून ताब्यात घेण्यात आले. याशिवाय १२ वॉन्टेड आरोपींनाही जेरबंद करण्यात आले.

याच कारवाईदरम्यान फरशी रोड परिसरातील आकाश बाबूलाल सोनवणे याच्याकडून सुमारे २० हजार रुपयांचा गुटखा, तर सिंधी कॉलनीतील सुगणमल किसनचंद बठेजा याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

तसेच सानेनगर, म्हाडा कॉलनी, पिळोदा, चांदणी कुंडे, कंजरवाडा, पिंपळी व पैलाड परिसरात सुरू असलेल्या ७ गावठी दारू भट्ट्यांवर धाड टाकून सुमारे सव्वा लाख रुपयांची गावठी दारू व रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. हातभट्ट्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या.

या धडक कारवाईमुळे अमळनेर शहरातील अवैध धंदे, फरार आरोपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, अशा प्रकारची कॉम्बिंग ऑपरेशन यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा....!